कवठ. आददांड वृक्षाला लगडणारी रानवट फळं. महाशिवरात्रीशिवाय अनेकांना ह्या फळाबद्दल फारसे ममत्व नाही. एक तर ते दिसायला ओबडधोबड. त्याला मिळालाय ना मोहक रंग ना दिलखेचक वास. फोडायला कठीण; पक्षीसुद्धा फारसे वाट्याला जाणार नाहीत झाडावर लटकणार्या फळांकडे. मला मात्र हे काहीसे उपेक्षित फळ कायम आपलसं वाटत आलय ते बर्याच कारणांमुळे.
एक म्हणजे हे फळ पित्ताला चांगले असे म्हणतात, त्यामुळे जरा मला जास्त जवळचे. पण त्याचबरोबर कोकिळेची नाजूक साद, आंब्याला फुटू पहाणार्या कोवळ्या मोहराचा घमघमाट अशा काही गोष्टींबरोबर कवठ हाही वसंताचा पक्का दूत! पापड-कुरडया अशा वाळवणांचे...थंडगार कलिंगडांचे... वाळ्याच्या हिरव्यागार सरबताचे... मोगर्याचा आणि मातीचा बरोबरीने वास येणार्या माठातील शांत करणार्या पाण्याचे... अभ्यास करताना तिखट-मीठ लावून खायच्या तोंड आंबवणार्य़ा कैरीच्या फोडींचे... आणि सर्वात महत्वाचे म्हणजे परिक्षेच्या छोट्याश्या खडतर अडथळ्यानंतर खुणावणार्या मोठ्या उन्हाळी सुट्टीचे दिवस खूप जवळ आले आहेत ह्याची मनाला आठवण करून देणारा असा हा कवठ!
अजून एक कारण म्हणजे मी जेव्हा जेव्हा कवठ पहातो तेव्हा नकळत माझं मन तासगावातील माझ्या बालपणीच्या दिवसात डोकावतं! विहिरीच्या आजूबाजूला असलेली कवठाची भली मोठ्ठी झाडं...आणि त्यांच्या सावलीत तासन तास खेळणारा मी...एखादं पडलेलं कवठ मिळालं तर दगडावर आपटून फोडून खाल्लेला तो काळपट-चॉकलेटी गर आणि नंतर क्वचित चरचरणारी जीभ! पुढे तासगावचा वाडा विस्तारू लागला, आणि त्या बापुड्या वॄक्षांनी ह्या विस्ताराला जागा करून दिली. जिथे त्यांची मुळं शतकान शतकं घट्ट रूतली होती तिथं वाड्यातील तुळया म्हणून ऑइलपेंटचा थर लापून घेणं नशिबात आलं त्यांच्या! कालाय तस्मै नमः...असो.
पूर्वी गावा-गावात सहज दृष्टीस पडणारे हे रानटी वृक्ष आता तसे दुर्मिळ होत चालले आहेत. त्यामुळे कवठफळ नक्की कसं दिसतं हे आपल्या स्मरणात असावं ह्यासाठी हा कवठाचा फोटॊ!

तर (नमनालाच घडाभर तेल ओतण्याच्या स्वभावाला एवढं जागून झाल्यावर) आता वळूयात साहित्य आणि कृतीकडॆ!
(खालील साहित्य हे खाद्यदर्दी अशा दोन किंवा गोडावर भक्ती आहे अशा तीन किंवा मधुमेहाची काळजी करणार्या चार किंवा डाएट्ची काळजी कळणार्या किमान आठ व्यक्तींना एका वेळेस पुरू शकेल.)
साहित्य:
दोन वाटी कवठाचा गर
अडीच वाटी पाणी
अडीच ते तीन वाटी साखर ( किती गोड आवडतो त्याप्रमाणे)
कृती:

दोन वाटी कवठाचा गर अडीच वाटी पाण्यात नीट मिसळून घ्यावा. (हॅंड मिक्सरने थोडे घुसळून घेतले तरी चालेल.) हे मिश्रण एक उकळी येईस्तोपर्यंत मध्यम आचेवर उकळत ठेवावा. एक उकळी आल्यानंतर हा गर स्वच्छ फडक्यातून/गाळण्यातून नीट गाळून घ्यावा.

ह्या गाळलेल्या मिश्रणात अडीच ते तीन वाटी साखर (आवडीप्रमाणे) मिसळावी.


गार झाल्यावर खायला घ्यावा. शेगडीच्या आचेवर कमीवेळ ठेवल्यास जेली केली आहे तर जास्त वेळ ठेवल्यास जॅम केला आहे असे इतरांना सांगावे.

जेली/जॅम तयार झाल्यानंतर ज्याच्याकडून ही पाककृती शिकली त्या गुरूचरणी नैवेद्य अर्पण करण्यास विसरू नये.