Monday, February 6, 2012

झटपट रवा डोसा


साहित्य :
२ वाट्या बारीक रवा,
१/२ वाटी मैदा,
१ वाटी तांदुळाचे पीठ,
मीठ चवीप्रमाणे,
हिंग चवीपुरते,
बारीक चिरलेल्या मिरच्या (२-३),
किसलेले आले १ छोटा चमचा,
बारीक चिरलेली कोथिंबीर (भरपूर),
पाणी / ताक + पाणी

खालील साहित्य हवे असल्यास घालणे :
मिरपूड (थोडी जाडसर चालेल) चवीप्रमाणे
किसलेले सुके खोबरे १-२ टे.स्पून
१ ते २ कांदे बारीक चिरून (ओनियन रवा डोसा बनवायचा असेल तर)

कृती:

सर्व साहित्य एकत्र करावे व नुसत्या पाण्यात किंवा ताक+पाणी वापरून भिजवावे. गुठळ्या राहू देऊ नयेत. मिश्रण नेहमीच्या डोश्याच्या पीठापेक्षा पातळ असावे (आमटीसारखे). किमान १५ मिनिटे झाकून ठेवावे.

निर्लेप / बीडाचा तवा तापत टाकावा. तवा चांगला तापल्यानंतर त्यावर थोडे बटर/तूप सोडून पसरून घ्यावे. मग डावाने पीठ तव्यावर गोलाकार घालावे. नेहमीच्या डोश्यासारखे पीठ पसरवायची आवश्यकता नाही, पातळ असल्यामुळे ते आपोआपच पसरेल आणि लगेच छान जाळी पडेल. बाजूने आणि वरून थोडे बटर / तूप सोडावे (डाएट पाळणा-यांनी ‘लो फ़ॅट’ चे बटर जसे की न्युट्रलाईट वापरावे किंवा बटर/तूप नाही वापरले तरी चालेल पण बटरमुळे येणा-या स्वादाला निश्चितच मुकाल :)).
एका बाजूने छान खरपूस भाजून झाले की मग डोसा उलटावा. मस्त कुरकुरीत रवा डोसा चटणी/बटाट्याच्या भाजी बरोबर खायला द्यावा.

5 comments:

  1. भारी!
    >> खायला द्यावा.
    कुणाला? ते लिहिलं नाहीत!

    ReplyDelete
    Replies
    1. अर्थातच, हाजिर तो वजिर! :)

      Delete
    2. परत कधी आहे रवाडोसाचा बेत?

      Delete
    3. तू येशील तेव्हा! कधी येतेस मग?

      Delete