Thursday, October 27, 2011

चकली





साहित्य - तांदूळ -- ४ वाट्या, हरबरा दाळ -- २ वाट्या, उडदाची दाळ -- १ वाटी, धणे -- २ वाट्या, तिखट, मीठ, ओवा, तीळ, तळणीसाठी तेल आणि सोर्‍या.

चकली भाजणी --
तांदूळ, हरबरा दाळ, उडदाची दाळ आधी धुवून (दोन, तीन वेळ धुवून) पसरायचे, थोड्या वेळाने (ओल्या असतानाच) दोन्ही दाळी खमंग भाजायच्या, तांदूळ गरम होईपर्यंत भाजायचे. धणे भाजून घ्यायचे. जाडसर पीठ दळून आणायचे.

आठ वाट्या भाजणीचे पीठ घेतल्यास त्यात एक वाटी कढत तेल टाकायचे, चवीप्रमाणे तिखट, मीठ, तीळ आणि ओवा घालायचे. नंतर गार पाण्याने पीठ चांगले मळायचे. पंधरा/वीस मिनिटे भिजू द्यायचे. सोर्‍यात घालतानाही मळून घालायचे.







कागदावर चकली घालून घ्यायची. तेल कढत तापल्यावर गॅस कमी करून साधारण मध्यम आचेवर चकल्या रंग बदलेपर्यंत तळून घ्यायच्या.

(चकलीच्या मधून नळी पडली असेल तर चकली खुसखुशीत होते.)

Monday, October 3, 2011

फोडणी

फोडणीचा शोध लावलेल्या माणसाबद्दल मला फार आदर आहे.

कढईत थोड तेल घ्याव. त्यात थोडी मोहोरी टाकावी. मोहोरी तडतडायला लागेली की मग जिरे, हिंग, हळद, तिखट टाकावं. जरुरीप्रमाणे मिरच्या, कढिलींब,कांदा टाकावा. मस्त फोडणी तयार. आता यात टाकत असलेल्या पदार्थांचा क्रम बदलला तर चवित फरक पडतो का? ते पहावे लागेल. पण कढईतली फोडणी, तव्यावरची फोडणी, लोखंडी पळीतली फोडणी यानी मात्र चवित फरक पडत असावा. आंबाड्याच्या भाजीला लोखंडी पळीतली फोडणी वरुन टाकल्याने काय झक्कास चव येते. फोडणीत हे वेगेवेगळे पदार्थ टाकताना काय मस्त आवाज येतात. फोडणी शिवाय पदार्थ याचा मी विचारच करु शकत नाही.

फोडणीचे हे मिश्रण शोधणारीला/ शोधणार्‍याला माझा साष्टांग नमस्कार....