Tuesday, January 6, 2015

थाई ग्रीन करी

जमवाजमव: यादी बरीच मोठी आहे!

वाटणासाठी: 
भरपूर कोथिंबीर, ४ कांदे,
गवतीचहाची ४-५ जाड धाटे (घरी गवतीचहा असेल तर कंदाच्या बाजूचा जाड भाग घेता येईल नाहीतर  मंडईत गवती चहाचे बिंडे बांधणारे लोक असतात, ते ही धाटे कापून टाकतात, त्यांच्याकडून मिळवता येतील. )
लसूण पात. ही नसेल तर ७-८ लसूण पाकळ्या.
भरपूर आलं. (थाई करीत galangal नावाचा आल्याचाच भाऊ वापरला जातो. तो मी शोधला, पण पुण्यात मिळाला नाही. त्यामुळे त्याऐवजी आलं.)
एका लिंबाचा रस आणि हिरव्या लिंबाची खिसलेली साल. सालीचा हिरवा भाग घ्यायचा. पांढरा नाही. (थाई करीत काफीर लाईमची पाने वापरतात, आपल्याकडे ती मिळत नाहीत.)
४-५ मिरच्या (तिखट चालत असल्या यापेक्षा जास्त)
मीठ, साखर

करीत घालण्यासाठी: 
फ्लोवर किंवा ब्रोकोली १००  ग्रॅम,  पनीर किंवा टोफू, बेबी कॉर्न, आवडत असतील तर मशरूम्स, ढोबळी मिरची,
जर सामिष करी हवी असेल तर वरील भाज्या कमी अथवा अजिबात न घालता त्याऐवजी अर्धा किलो  बोनलेस चिकनचे तुकडे.

याशिवाय, एक ते दीड वाटी नारळाचे दूध, थोडा वाटलेला नारळ, बेसिलची पाने (मंडईत मिळतात) आणि लोणी किंवा तेल.

कसे कराल?

हिरव्या मिरच्या थोड्याशा कोमट पाण्यात ठेवा.
वाटणासाठीचे साहित्य बारीक चिरून घ्या व मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. पाणी लागल्यास मिरच्यांचेच घाला. मिरच्याही बारीक वाटून घ्या. त्यात लिंबाचा रस घाला.
भाज्या उभ्या, मोठ्या चिरून घ्या. पनीरचे चौकोनी तुकडे.
कढईत थोडे लोणी किंवा तेल घेऊन ते तापल्यावर त्यात हिरवे वाटण एक मिनिटभर परतून घ्या. नंतर त्यात भाज्या घालून २-३ मिनिटे परता. चिकन घालणार असाल तर ते थोडे जास्त वेळ परतून,   झाकण ठेवून, पाच सात मिनिटे मंद आचेवर शिजू द्या.
यानंतर नारळाचे दूध घालून, एक उकळी आली की उतरवा.
वाढून घेताना एखादे बेसिल पान त्यावर ठेवा. त्याचा वास करीची लज्जत वाढवतो.


हिरवा डॉट आणि लाल डॉट वाली मंडळी एकत्र जेवायला असतील तर सर्वांसाठी एकच वाटण करून करीतले घटक फक्त बदलायचे.
हिरवेही खुश आणि लालेही!


पुदिना-काकडी

जमवाजमव: 

एक वाटीभर घट्ट दही. आपल्या घरातल्या किंवा विकतच्या दह्यात पाणी भरपूर असते. असे दही एका पांढऱ्यास्वच्छ , सुती  कापडात तास-दोन तास बांधून, टांगून ठेवावे. (यातून ठिबकणारे पाणी  अर्थातच पिऊन टाकावे किंवा स्वयंपाकात वापरावे). असे कापडातले घट्ट दही वाटीभर.
४-५ काकड्या: हिरव्यागार मावळी काकड्या उत्तम. नेहमीच्या खिरा काकड्याही चालतीलच.
वाटीभर पुदिना पाने: आवडत असल्यास जास्तही घ्यायला हरकत नाही.
मीठ, साखर चवीप्रमाणे
आणि हवे असल्यास हिरवी मिरची, जिरेपूड.

कसे कराल?

पुदिना खलबत्त्यात अथवा मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. एका पसरट भांड्यात दही घेऊन त्यात हे वाटण, मीठ आणि साखर कालवा. पुदिना-काकडी सलाड म्हणून हवे असेल तर एवढेच पुरे. कोशिंबीर म्हणून, पोळीला लावून खायची असेल तर त्यात जिरेपूड आणि एक वाटलेली मिरची घाला.
काकडीचे सालासकट काप करा किंवा छोटे तुकडे करून ठेवा. अगदी खायला घ्यायच्या वेळी ही चिरलेली काकडी दह्यात मिसळा. आधीपासून मिसळली तर काकडीला पाणी सुटते, मग घट्ट दह्याची मजा रहात नाही. कोशिंबीर करायची असेल तर काकडी खिसून अथवा चोचवून घ्यायची आणि ती पिळून त्यातील पाणी काढून टाकायचे (काढून अर्थातच ते पिऊन टाकायचे) आणि आयत्यावेळी काकडी दह्यात मिसळायची.
यात आणखी मोडाचे मूग, कांद्याचे काप घातले तरी छान लागेल.