Wednesday, October 5, 2022

 कारल्याची भाजी -




मीठ लावून भाजी चाळणीवर / steamer वर वाफलणे. 
भाजी सकाळी हवी असेल तर रात्री वाफवून फ्रिजमधे ठेवली तरी चालतील. 
(गार झाल्यावर सारण भरले की कारली तुटत पण नाही.) 

भरायचे सारण - 
किसलेलं सुकं खोबरं, दाण्याचा कूट, मीठ, हळद, तिखट, गोडा मसाला, 
लसूण पेस्ट, धने पावडर, चवीप्रमाणे/आवडीनुसार गूळ, 
लिंबू रसाचे 3-४ थेंब, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर.

शक्यतो छोटी कारली वापरायची, म्हणजे ज्याचे फक्त दोन भाग होतील. 
त्यामुळे एक बाजू बंद मिळते व सारण आत पक्कं बसतं. निघत नाही.

सगळं एकत्रित कालवून घेणे. 
कारल्यामधे भरणे. 
भरलेली कारली फोडणीला टाकणे. चिंचेचा कोळ/साॅस घालणे. 
परतून थोडावेळ वाफवणे. 
सुंदर भाजी तयार.

Friday, September 9, 2022

 उकडीचे मोदक - 


साहित्य - 

- दोन वाट्या नारळाचा चव

- दोन वाट्या तांदूळ पिठी (मोदकांसाठी असते ती)

- एक शिगोशीग भरून बारीक चिरलेला गूळ

- चमचाभर खसखस

- वेलची पूड

- जायफळ

- साजूक तूप 

- मोदकाचा साचा असल्यास उत्तम. (साचा वापरताना आधी साजूक तुपाचे बोट फिरवून मग उकडीचा गोळा घालावा). साचा नसल्यास पारंपारिक पद्धतीप्रमाणे हाताचे, बोटांचे कौशल्य वापरून मोदक तयार करावा.

- स्टीमर असल्यास उत्तम. अन्यथा पारंपारिक पद्धतीप्रमाणे पातेल्यामध्ये पाणी घालून वर चाळणी ठेवावी. चाळणीत पातळ सुती कापड टाकून मग मोदक वाफलून घ्यावेत. (स्टीमरमध्ये पण सुती कापड वापरावे.)


मधुरा रेसिपीप्रमाणे सगळी कृती बघता येईल. 

https://youtu.be/zXpAROreb6g 

https://youtu.be/KRBTzb2cuK4 


दोन्हीपैकी कोणतीही कृती चालेल. 

सुंदर मोदक तयार.









Sunday, July 22, 2018

रशियन सॅलड




साहित्य - सफरचंद, अननस, डाळिंब, बटाटे, मटार, श्रावण घेवडा, गाजर
ड्रेसिंग साठी - मेयोनीज, क्रीम, दही, मीरपूड, मोहरीची पूड, चिली फ्लेक्स, ओरेगानो, मीठ
वेळ - भाज्या-फळे चिरणे ४० मि. + उकडणे १८मि. + ड्रेसिंग ५ मि. + एकत्रित करणे ५ मि.
         एकूण वेळ - ५० मि.
किती जणांसाठी - ८

कृती - १) प्रथम बटाटे कुकरमधे उकडायला ठेवावेत. ( भात किंवा इतर काही करणार असाल तर त्यासोबत! :)) उकडून झाल्यावर साल काढून चौकोनी तुकडे (१ वाटी) करावेत.
२) गाजराचे चौकोनी तुकडे करून घ्यावेत, मटार सोलून घ्यावेत, श्रावण घेवड्याचे बारीक तुकडे करून घ्यावेत,
हे सगळे तुकडे प्रत्येकी एकेक वाटी घ्यावेत. पातेल्यात एक वाटी पाणी घालून त्यात हे सर्व तुकडे घालावेत व मंद आचेवर १० ते १२ मि. ठेवावेत. साधारण मऊपणा मोडेपर्यंत , फार शिजवू नयेत. मग बाहेर काढून निथळायला ठेवावेत. ( निथळलेले पाणी स्वैपाकात वापरता येईल. :))
३) सफरचंदाचे १ वाटी चौकोनी तुकडे करावेत. अननसाचेही १ वाटी चौकोनी तुकडे करावेत व एक वाटी डाळिंबाचे दाणे घ्यावेत.

ड्रेसिंग - चार चमचे मेयोनिज + चार चमचे फ्रेश क्रीम ( अमूलचं किंवा घरचं) + चार चमचे घट्ट दही एकत्रित करून फेटावे, मग त्यात छोटा ( तिखट मीठाचा) चमचा , अर्धा चमचा मीरपूड व अर्धा चमचा मोहरीची पूड तसंच चमचाभर चिली फ्लेक्स व चमचाभर ओरेगानो पूड , चवीपुरते मीठ ,घालून एकजीव करावे.

सगळ्या भाज्या आणि फळांचे तुकडे ( प्रत्येकी १ वाटी) एकत्र करून त्यावर ड्रेसिंग घालून व्यवस्थित कालवावे व साधारण तासभर फ्रिजमधे ठेवावे.

नंतर खाण्यासाठी तयार!!
:)

Tuesday, January 6, 2015

थाई ग्रीन करी

जमवाजमव: यादी बरीच मोठी आहे!

वाटणासाठी: 
भरपूर कोथिंबीर, ४ कांदे,
गवतीचहाची ४-५ जाड धाटे (घरी गवतीचहा असेल तर कंदाच्या बाजूचा जाड भाग घेता येईल नाहीतर  मंडईत गवती चहाचे बिंडे बांधणारे लोक असतात, ते ही धाटे कापून टाकतात, त्यांच्याकडून मिळवता येतील. )
लसूण पात. ही नसेल तर ७-८ लसूण पाकळ्या.
भरपूर आलं. (थाई करीत galangal नावाचा आल्याचाच भाऊ वापरला जातो. तो मी शोधला, पण पुण्यात मिळाला नाही. त्यामुळे त्याऐवजी आलं.)
एका लिंबाचा रस आणि हिरव्या लिंबाची खिसलेली साल. सालीचा हिरवा भाग घ्यायचा. पांढरा नाही. (थाई करीत काफीर लाईमची पाने वापरतात, आपल्याकडे ती मिळत नाहीत.)
४-५ मिरच्या (तिखट चालत असल्या यापेक्षा जास्त)
मीठ, साखर

करीत घालण्यासाठी: 
फ्लोवर किंवा ब्रोकोली १००  ग्रॅम,  पनीर किंवा टोफू, बेबी कॉर्न, आवडत असतील तर मशरूम्स, ढोबळी मिरची,
जर सामिष करी हवी असेल तर वरील भाज्या कमी अथवा अजिबात न घालता त्याऐवजी अर्धा किलो  बोनलेस चिकनचे तुकडे.

याशिवाय, एक ते दीड वाटी नारळाचे दूध, थोडा वाटलेला नारळ, बेसिलची पाने (मंडईत मिळतात) आणि लोणी किंवा तेल.

कसे कराल?

हिरव्या मिरच्या थोड्याशा कोमट पाण्यात ठेवा.
वाटणासाठीचे साहित्य बारीक चिरून घ्या व मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. पाणी लागल्यास मिरच्यांचेच घाला. मिरच्याही बारीक वाटून घ्या. त्यात लिंबाचा रस घाला.
भाज्या उभ्या, मोठ्या चिरून घ्या. पनीरचे चौकोनी तुकडे.
कढईत थोडे लोणी किंवा तेल घेऊन ते तापल्यावर त्यात हिरवे वाटण एक मिनिटभर परतून घ्या. नंतर त्यात भाज्या घालून २-३ मिनिटे परता. चिकन घालणार असाल तर ते थोडे जास्त वेळ परतून,   झाकण ठेवून, पाच सात मिनिटे मंद आचेवर शिजू द्या.
यानंतर नारळाचे दूध घालून, एक उकळी आली की उतरवा.
वाढून घेताना एखादे बेसिल पान त्यावर ठेवा. त्याचा वास करीची लज्जत वाढवतो.


हिरवा डॉट आणि लाल डॉट वाली मंडळी एकत्र जेवायला असतील तर सर्वांसाठी एकच वाटण करून करीतले घटक फक्त बदलायचे.
हिरवेही खुश आणि लालेही!


पुदिना-काकडी

जमवाजमव: 

एक वाटीभर घट्ट दही. आपल्या घरातल्या किंवा विकतच्या दह्यात पाणी भरपूर असते. असे दही एका पांढऱ्यास्वच्छ , सुती  कापडात तास-दोन तास बांधून, टांगून ठेवावे. (यातून ठिबकणारे पाणी  अर्थातच पिऊन टाकावे किंवा स्वयंपाकात वापरावे). असे कापडातले घट्ट दही वाटीभर.
४-५ काकड्या: हिरव्यागार मावळी काकड्या उत्तम. नेहमीच्या खिरा काकड्याही चालतीलच.
वाटीभर पुदिना पाने: आवडत असल्यास जास्तही घ्यायला हरकत नाही.
मीठ, साखर चवीप्रमाणे
आणि हवे असल्यास हिरवी मिरची, जिरेपूड.

कसे कराल?

पुदिना खलबत्त्यात अथवा मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. एका पसरट भांड्यात दही घेऊन त्यात हे वाटण, मीठ आणि साखर कालवा. पुदिना-काकडी सलाड म्हणून हवे असेल तर एवढेच पुरे. कोशिंबीर म्हणून, पोळीला लावून खायची असेल तर त्यात जिरेपूड आणि एक वाटलेली मिरची घाला.
काकडीचे सालासकट काप करा किंवा छोटे तुकडे करून ठेवा. अगदी खायला घ्यायच्या वेळी ही चिरलेली काकडी दह्यात मिसळा. आधीपासून मिसळली तर काकडीला पाणी सुटते, मग घट्ट दह्याची मजा रहात नाही. कोशिंबीर करायची असेल तर काकडी खिसून अथवा चोचवून घ्यायची आणि ती पिळून त्यातील पाणी काढून टाकायचे (काढून अर्थातच ते पिऊन टाकायचे) आणि आयत्यावेळी काकडी दह्यात मिसळायची.
यात आणखी मोडाचे मूग, कांद्याचे काप घातले तरी छान लागेल.



Wednesday, July 23, 2014

कस्टर्ड कॅरॅमल

गेले अनेक दिवस ही पाकक्रीया करुन बघायचे मनात होते. अतिशय सोपी अशी ही पाकक्रीया आहे.

दोघांसाठी
साहित्य - दोन अंडी, पाव लिटर दुध, साखर, व्हॅनिला इसेन्स, ओव्हन

दुध मंद आचेवर उकळत ठेवावे. अंडी फोडुन त्याच ४-५ चमचे साखर घालून मिश्रण फेटून घ्यावे. मग या मिश्रणात थोडे उकळलेले दुध घालावे व दुध ओतताना मिश्रण हलवत रहावे. नंतर उरलेले दुध टाकावे व मिश्रण नीट एकजीव होई पर्यंत हलवावे.

नॉन स्टिक तव्यावर ४-५ चमचे साख्रर टाकून त्याल गॅसवर ठेवावे. त्यात १-२ चमचे पाणी घालावे व साखर लाकडी चमच्याने हलवत रहावी. साखरेचा पाक हा ब्राउन रंगाचा होई पर्यंत गॅसवर ठेवावे. नंतर हे कॅरॅमल थोडे इनॅमलच्या भांड्यात ओतून त्यावर अंडी आणि दुधाचे मिश्रण घालावे.

ओव्हनमधील ट्रे मधे थोडे पाणी घालून ही भांडी १८० तापमानावर १५ मिनिटे ठेवावीत. ओव्हन मधुन काढल्यावर १ तास फ्रीजमधे ठेउन खायला द्यावीत.

यातिल सर्वात महत्वाचा भाग महणजे कॅरॅमल तयार करणे हा आहे.